जळगाव : काल पहाटे सुमारे ४:३० वाजता आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे समतानगर परिसरातील एका घरावरील पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घराचे छप्पर उघडे पडल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसराचे नगरसेवक अनिल अडकमोल यांनी तत्काळ दखल घेत सकाळीच सुमारे सहा वाजता घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली तसेच झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. घरावरील पत्रे उडाल्याने कुटुंबाला निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेत आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी नगरसेवक अनिल अडकमोल यांनी मेहरूण येथील तलाठी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेचा तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या आपत्ती निवारण योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी आवश्यक ती सर्व प्रशासकीय प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून मदत मिळणे आवश्यक असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
या पाहणी दौऱ्यावेळी प्रताप बनसोडे, शालिक सपकाळे, भगवान बाविस्कर, प्रमोद शैदाणे, समीर शेख, सुनिल गाडे आणि राहूल अहिरे आदी उपस्थित होते. त्यांनीही नुकसानग्रस्त कुटुंबाला धीर देत आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.

Social Plugin