लग्नासाठी दबाव; फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग

 


शहरातील २५ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून तिचे फोटो काढणे, घरात घुसून लग्नासाठी दबाव टाकणे तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास संबंधित तरुणी आपल्या मावशीच्या मदतीसाठी जात होती. त्यावेळी संशयित सागर भरत महाले (वय २८, रा. सकरनगर, समता स्कूलजवळ, मूळ रा. धुळे, सध्या नाशिक) याने तिचा पाठलाग करून रस्त्यात अडविले. त्यानंतर तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून काही फोटो काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यापुढे संशयिताने तरुणी राहत असलेल्या घरात प्रवेश करून तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला. तसेच लग्नास नकार दिल्यास काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेनंतर पीडित तरुणीने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून सागर महाले याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.