नंदूभाऊ महाजन : पक्षनिष्ठा, स्पष्टवक्तेपणा आणि जनतेशी असलेली नाळ

 


आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत सत्तेच्या समीकरणांसाठी पक्षांतर आणि भूमिकांमध्ये सातत्याने बदल करणारे अनेक नेते राज्याने आणि जळगाव जिल्ह्याने पाहिले आहेत. अशा काळात आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून एकाच पक्षाशी आणि विचारधारेशी निष्ठावान राहिलेले नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांची ओळख निर्माण झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला असून, महायुतीच्या व्यापक पाठिंब्यामुळे त्यांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळकट झाल्या आहेत. तांदलवाडी गावाला पुन्हा एकदा आमदारपदाचा मान मिळण्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे.


स्पष्ट भूमिका आणि माणुसकीचा विचार

नंदूभाऊ महाजन यांची राजकीय वाटचाल स्पष्टवक्तेपणा आणि जनसामान्यांशी असलेल्या प्रामाणिक नात्यासाठी ओळखली जाते. जनतेच्या प्रश्नांवर किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवताना त्यांनी कधीही संकोच बाळगला नाही. आजच्या जातीय आणि गटबाजीच्या राजकारणात त्यांनी नेहमीच माणुसकीला प्राधान्य दिले. ‘माणूस हीच जात आणि माणुसकी हाच धर्म’ या विचारावर त्यांची ठाम श्रद्धा असल्याचे त्यांच्या सार्वजनिक जीवनातून सातत्याने दिसून आले आहे.

ग्रामीण विकासासाठी सातत्यपूर्ण योगदान

जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना नंदूभाऊंनी ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य दिले. जिल्हा परिषद तसेच जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या कार्यकाळात त्यांनी सहकार क्षेत्राशी जवळीक राखत विविध विकासकामांना चालना दिली. तापी, पूर्णा आणि गिरणा नदीकाठच्या शेतकरी बांधवांमध्ये त्यांच्याविषयी विशेष विश्वास निर्माण झाला असून, त्यांच्या उमेदवारीकडे शेतकरी समाज आशेने पाहत आहे. अनेकांच्या मते, ही निवडणूक एखाद्या राजकीय नेत्याची नसून आपल्या कुटुंबातील जबाबदार प्रतिनिधीची लढत आहे.

महायुतीची एकजूट आणि विजयाचा आत्मविश्वास

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद नंदूभाऊ महाजन यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी जपलेली सर्वसमावेशक प्रतिमा आणि विविध घटकांशी ठेवलेला संवाद हा त्यांच्या विजयाचा महत्त्वाचा आधार मानला जात आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर म्हणाले, “पक्ष कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे काम बारकाईने पाहत असतो. नंदकिशोर महाजन यांना मिळालेली उमेदवारी ही त्यांच्या दीर्घकालीन पक्षनिष्ठेची आणि कार्याची पावती आहे. महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधी आणि मतदार आपली जबाबदारी पार पाडतील आणि हा विजय ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास आहे.”

विधानपरिषदेत शेतकऱ्यांचा बुलंद आवाज

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत प्रामुख्याने प्रभावशाली राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना संधी मिळाल्याचे चित्र राहिले आहे. मात्र, यंदा नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने ग्रामीण वास्तवाची जाण असलेले, शेतकरी कुटुंबातून आलेले आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने काम करणारे नेतृत्व विधानपरिषदेपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकरी, ग्रामीण भाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत अधिक प्रभावीपणे मांडणारा प्रतिनिधी मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाभरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.