चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून एकूण ८० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तसेच स्वतंत्र कारवाईत विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका इसमासह यामाहा FZ मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २८९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना आरोपी राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने चोरीस गेलेली HF डिलक्स मोटारसायकल चोरल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री करून राहुल भिसे यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. सखोल चौकशीमध्ये त्याने चोरीची HF डिलक्स मोटारसायकल प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव) याला २० हजार रुपयांत विकल्याची कबुली दिली. त्यानुसार प्रशांत राजपूत यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता संबंधित मोटारसायकल खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत आरोपींकडून एकूण ८० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी चाळीसगाव शहरात गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करत असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन फिरणारा एक संशयित इसम आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले. मात्र मोटारसायकलबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने त्याच्यासह २५ हजार रुपये किंमतीची यामाहा FZ मोटारसायकल जप्त करून पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Social Plugin