जळगाव विधानपरिषद निवडणूक : महायुतीचे नंदकिशोर महाजन यांचा विक्रमी विजय

 



जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी दणदणीत आणि विक्रमी विजय मिळवला आहे. पहिल्याच फेरीत आवश्यक मतांचा टप्पा पार करत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी मात केली.

यंदाची जळगाव विधानपरिषद निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली होती. महायुतीमध्ये ही जागा भाजपला मिळणार की शिवसेनेला, यावर मोठी राजकीय चर्चा रंगली. अखेर ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर अनेक इच्छुकांना मागे टाकत रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली.

दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून शरद तायडे यांना उमेदवारी मिळाल्याने सुरुवातीला चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले. मात्र, माघारीनंतर रेश्मा काळे आणि अनिल चौधरी यांनी उमेदवारी मागे घेतल्याने अखेरीस नंदकिशोर महाजन आणि शरद तायडे यांच्यात थेट सामना झाला.

१८ जून रोजी झालेल्या मतदानात तब्बल ९७ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

आज (२२ जून) सकाळी ८ वाजता अल्पबचत भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. बॅलेट पेपरद्वारे झालेल्या या निवडणुकीत मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून नंदकिशोर महाजन यांनी स्पष्ट आघाडी घेतली. त्यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा टप्पा पहिल्याच फेरीत पार केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्याची गरजच भासली नाही. महाजन यांना तब्बल ५८२ मते मिळाली, महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे १७ अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना ११ तर रेश्मा काळे यांना १ मत मिळाले आहे.  दरम्यान नंदू महाजन यांच्या विजयाने महायुतीने या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले.

विजयाची चाहूल लागताच महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. अधिकृत निकालाची घोषणा काही वेळात करण्यात येणार असली, तरी नंदकिशोर महाजन यांच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.