जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील विषारी गावठी दारू व बनावट विदेशी दारू विक्रीप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी येत्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करून जिल्ह्यातील बेकायदा दारू विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, जिल्ह्यात रसायनयुक्त विषारी गावठी दारू आणि बनावट विदेशी दारूची खुलेआम विक्री होत असून, या प्रकारामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात या संदर्भात मंत्रीस्तरावर तक्रार केल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने धाडसत्र सुरू केले. मात्र, ही कारवाई जनहितासाठी नसून केवळ दिखावा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
तसेच, अवैध दारू विक्रेत्यांकडून वाढीव हप्ते वसूल करण्यासाठी कारवाईचा वापर होत असल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांसह जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यापूर्वी राबविण्यात आलेल्या कारवायांचे सातत्य का राखले गेले नाही, गेल्या काही महिन्यांत किती कारवाया करण्यात आल्या, किती गुन्हे दाखल झाले आणि किती आरोपींना शिक्षा झाली, याबाबतही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, राकेश सोनार, भाग्यश्री ठाकरे, निलेश कोलते, विलास पाटील, अतुल चव्हाण, सोपान दुट्टे, आसिफ बागवान, अॅड. देवकांत पाटील, विनोद पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टीप : या वृत्तातील आरोप हे तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीवर आधारित असून, संबंधित अधिकारी किंवा विभागाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.

Social Plugin