गुजरातची चोरीची कार जळगावात जप्त! ९ लाखांची किया कॅरेन्स पोलिसांच्या ताब्यात

 



जळगाव : गुजरात राज्यातील अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातील बोपल पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेली सुमारे ९ लाख रुपये किंमतीची किया कंपनीची कॅरेन्स मोटार कार एमआयडीसी पोलिसांनी जळगावात जप्त केली. नाकाबंदी दरम्यान वाहन चालकाने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहनासह चालकाला ताब्यात घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.

बोपल पोलीस स्टेशन, अहमदाबाद ग्रामीण (गुजरात) येथे दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी किया कॅरेन्स मोटार कार क्रमांक MP 04 ZL 5155 चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या वाहनाबाबत दिनांक १८ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सदर वाहन नशिराबाद टोलनाका ओलांडून जळगावच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली.

या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे पोहेकॉ संदीप सपकाळे, पोकॉ रमेश अहिरे व पोकॉ अफजल बागवान यांनी काशीनाथ चौक येथे नाकाबंदी केली. सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने अजिंठा चौफुलीकडे नेले.

यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून अजिंठा चौफुली परिसरातील हिरो होंडा शोरूमसमोर वाहन अडविले. चौकशीदरम्यान हे वाहन गुजरातमधील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वाहन व चालकास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे आणले. त्यानंतर बोपल पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. दिनांक १९ जून २०२६ रोजी गुजरात पोलिसांच्या पथकाने जळगाव येथे येऊन वाहन व चालकाचा नियमानुसार ताबा घेतला.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोहेकॉ संदीप सपकाळे, पोकॉ रमेश अहिरे व पोकॉ अफजल बागवान यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.