TWJ फसवणूक प्रकरणात आणखी एक संचालक अटकेत; 279 गुंतवणूकदारांची 23.81 कोटींची फसवणूक

 


जळगाव | प्रतिनिधी

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी TWJ Associates Pvt. Ltd. आणि तिची उपकंपनी TWJ Infrastructures Development Pvt. Ltd. विरोधात सुरू असलेल्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. TWJ Infrastructures Development Pvt. Ltd. चे संचालक तथा TWJ Associates Pvt. Ltd. चे बिझनेस हेड संकेश रामकृष्ण घाग (वय 39) याला अटक करण्यात आली आहे.


जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली दरमहा 3 ते 5 टक्के परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक स्वीकारली. मात्र, नंतर परतावा न देता 279 गुंतवणूकदारांची तब्बल 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


या प्रकरणी भरत रतीलाल पवार (रा. पाळधी) यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.


यापूर्वी जळगाव शाखेचे व्यवस्थापक मिलिंद शालिकराव पाटील यांना 14 मे 2026 रोजी अटक करण्यात आली होती. तसेच मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांनाही न्यायालयाच्या परवानगीनंतर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.


तपासादरम्यान कंपनीच्या व्यवहारांमधून गुंतवणूकदारांच्या रकमेतून 1 कोटी 56 लाख 44 हजार 798 रुपये TWJ Associates Pvt. Ltd. मार्फत संकेश घाग यांच्या TWJ Infrastructures Development Pvt. Ltd. या कंपनीकडे वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या आर्थिक व्यवहारांबाबत अधिक तपास सुरू आहे.


संकेश घाग याला चिपळूण येथील एका गुन्ह्यात यापूर्वी अटक झाली होती. तो रत्नागिरी विशेष कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना न्यायालयाच्या परवानगीने त्याचा ताबा घेऊन 5 जून 2026 रोजी या प्रकरणात अटक करण्यात आली. त्याला जळगाव येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 8 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, TWJ कंपनीच्या संचालकांविरोधात यवतमाळ, रत्नागिरी, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि कोल्हापूर येथेही फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेने TWJ जळगाव शाखेत गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांना पुढे येऊन त्यांच्या गुंतवणुकीची माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे.