केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या जंगी स्वागताची तयारी : सागर पार्कवर युवाशक्ती संगम कार्यक्रमात युवकांना संबोधित करणार.

 





देशाचे यशस्वी गृहमंत्री अमितजी शाहा आज जळगावात येत असून या अनुषंगाने जोरदार तयारी करण्यात आली आहे.  त्यांच्या उपस्थितीत युवाशक्ती संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात शाहा हे तरूण कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.


सागर पार्क मैदानावरील तयारी ही कालच पूर्ण करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली याचे नियोजन करण्यात आले आहे. आज दुपारी शाहा यांचे आगमन झाल्यानंतर सहा ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तर मुख्य कार्यक्रम हा सागर पार्क मैदानावर होणार आहे. दरम्यान, आजच अमित शाहा हे दोन्ही लोकसभा जागांबाबत नेत्यांसोबत चर्चा करण्याची देखील शक्यता आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा जळगाव दौरा हा अतिशय महत्वाचा मानला जात असून या माध्यमातून भारतीय जनता पक्ष रणशिंग फुंकणार असल्याचे दिसून येत आहे. काल रात्रीपासूनच गृहमंत्र्यांच्या आगमनाच्या मार्गासह सभास्थळी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर शाहांच्या स्वागतासाठी भाजपचे झेंडे, फलक, नेते आणि पदाधिकार्‍यांचे बॅनर्स आदींच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.