व्हि.डी. पाटील कोण आहे ? हे तुला माहित होत तरी तू तक्रार दिली. याचे परिणाम तुला भोगावे लागतील अजय बढे यांना धमकी






शेततळ्यांचे काम मिळवून देण्याच्या  नावाखाली  आपली 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप कंत्राटदार अजय भागवत बढे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत  केला होता. याच प्रकरणातील एका संशयिताने सोमवारी बढे यांना व्हाट्सअप मॅसेज  करून व्ही. डी पाटील यांच्या नावाने धमकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की,   कंत्राटदार अजय भागवत बढे यांना तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी आठ जणांनी सुमारे ४५ लाख रूपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार  नुकताच  उघडकीस  आला आहे. या प्रकरणी बढे यांनी जळगाव न्यायालयात धाव घेतल्यानंतर आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या संदर्भात तीन दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन अजय बढे यांनी विस्तृत माहिती दिली होती. या संशयितांमध्ये तापी महामंडळाचे सेवानिवृत्त अभियंता तथा माजी विभागीय माहिती आयुक्त व्हि. डी. पाटील यांच्या नावाचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.


दरम्यान, यानंतर आज सकाळी अजय बढे यांच्या स्मार्टफोनवर व्हाटसअप मॅसेज करून पंकज नेमाडे यांनी त्यांना धमकावले. व्हि.डी. पाटील कोण आहे ? हे तुला माहित असून देखील तू त्यांच्या विरूध्द तक्रार दिल्यामुळे याचे परिणाम तुला भोगावे लागतील अशा आशयाचा हा मॅसेज होता. अजय बढे यांनी हा मॅसेज वाचल्यानंतर नेमाडे यांनी हा मॅसेज डिलीट करून टाकला. या संदर्भात अजय बढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जळगाव शहर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.