शिरसोली रोडवरील देवकर कॉलेजच्या पुढे एका झाडावर कार आदळल्याने जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे वय 39 यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून सोबत असलेले दोघ मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे आज रविवारी १४ जुलै रोजी दुपारी मित्र भैरव भगवान राणे आणि पप्पू आढाव यांच्यासोबत कारने शिरसोली गावाजवळील हॉटेल एमएच 19 येथे जेवण करण्यासाठी गेले होते .
दरम्यान जेवण आटोपून कासमवाडी येथे येण्यासाठी निघाले असता दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुलाबराव देवकर कॉलेजच्या पुढे एका झाडावर त्यांची कार आदळली. या भीषण अपघातात आनंद सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले भैरव राणे आणि पप्पू आव्हाड हे गंभीरित्या जखमी झाले. दरम्यान आनंद सोनवणे यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच मित्र परिवारांनी मोठी गर्दी केली आहे.आनंद सोनवणे यांच्या पश्चात दोन भाऊ, आई-वडील, पत्नी, दोन मुल असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.


Social Plugin