धुळे - दि. १७ सप्टेंबर २०२४ ते दि. १७ सप्टेंबर २०२५ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. कॉ. शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जीवनकार्य अधिक प्रभावीपणे कालसुसंगत स्वरुपात सर्वदूर पोहोचवण्यासाठी, त्यांच्या विचारांवर चिकित्सक चर्चा घडवून आणण्यासाठी वर्षभर महाराष्ट्रात विविध कार्यक्रम- उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.हे सर्व कार्यक्रम-उपक्रम आयोजित करण्यात 'कॉ. शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती' पुढाकार घेत असून कॉ. शरद पाटील यांच्या विचार आणि कार्याविषयी अनुबंध बाळगणाऱ्या तसेच त्यांच्या विचारांशी चिकित्सक संबंध बाळगणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी एकत्रितपणे परस्पर सहकार्यातून संपूर्ण वर्षाचे नियोजन करून कॉ. शरद पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करायची आहे.करिता 'कॉ. शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती' चे गठन करण्यात आलेली आहे.या समितीच्यावतीने दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी जन्मशताब्दीनिमित्त धुळे शहरात रॅली व परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांनी जी मार्क्सवादाची मांडणी केली तोच खरा भारतीय मार्क्सवाद आहे. त्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांचं तत्त्वज्ञान म्हणजेच भारतीय मार्क्सवाद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सव समिती महाराष्ट्र आणि स्थानिक संयोजन समिती धुळे तर्फे संत रविदास उद्यानात मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कॉम्रेड शरद पाटील यांचे तत्त्वज्ञान आणि समकालीन समाजक्रांतीचा पेच या विषयावरील राज्यव्यापी परिषदेत डॉ. कसबे बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व कार्यकर्त्या कॉम्रेड नजूबाई गावित होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोपाळ गुरु, अभ्यासक व कार्यकर्ते कॉम्रेड भालचंद्र कानगो, इतिहासकार डॉक्टर उमेश बगाडे, प्राध्यापक बाबा हातेकर,रामेश्वर चत्रे ,परिषदेचे निमंत्रक सिद्धार्थ जगदेव आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
रॅली ची सुरुवात सकाळी १०.०० वा.संत रविदास भवन येथून करण्यात आली. वाडीभोकर रोडने - जयहिंद कॉलेज - पंचायत समिती मार्गे - कॉ.शरद पाटील यांचे निवासस्थानी अभिवादन करून संत रविदास भवन देवपूर येथे कॉ. नजुबाई गावित यांचे अध्यक्षतेखाली परिषद संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी केले.तर कॉ.भालचंद्र कानगो,डॉ.गोपाळ गुरू,संध्या नरे पवार,डॉ.उमेश बगाडे यांनीकॉ.शपांचे तत्त्वज्ञान आणि समकालीन समाज क्रांतीचा पेच या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.
उद्घाटनपर भाषणात बोलताना डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणाले की, कॉम्रेड शरद पाटील हे खऱ्या अर्थाने कलाकार होते परंतु ते विचारवंत झाले. त्यांनी भारतीय मार्क्सवादाची जी मांडणी केली त्यातून आपल्याला एकंदरीतच भारतीय समाज व्यवस्था आणि तिचे अंतरंग स्पष्ट होतात. कॉम्रेड शरद पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून जी आंदोलने केली,जे मोर्चे काढलेत. या सर्व उपक्रमांमधून आपल्याला खऱ्या भारताचे दर्शन कॉम्रेड शरद पाटील यांनी घडवून आणलं. परिषदेत कॉम्रेड गोपाळ गुरु, कॉम्रेड भालचंद्र कांगो, प्रा.डॉक्टर वंदना महाजन यांचीही अभ्यासपूर्ण भाषणे झाली. कॉम्रेड नजूबाई गावित यांच्या अध्यक्षीय भाषणाने परिषदेचा समारोप झाला. परिषद सुरू होण्याअगोदर परिषद स्थळापासून कॉम्रेड शरद पाटील यांच्या 'असंतोष' या निवासस्थानापर्यंत भव्य अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मान्यवरांसह सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टी, सत्यशोधक जनआंदोलन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक महिला सभा यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये कॉम्रेड शरद पाटील को लाल सलाम, जय भीम कॉम्रेड, लाल सलाम कॉम्रेड, जिंदाबाद कॉम्रेड अशा गगनभेदी घोषणांनी रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतलं. रॅलीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचे लेझीम नृत्य आणि अस्सल आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देणार पारंपारिक नृत्य लक्षवेधी ठरलं. कॉम्रेड शरद पाटील यांच्या निवासस्थानी अभिवादन केल्यानंतर रॅली पुन्हा परिषद स्थळी आली. त्यानंतर परिषदेला सुरुवात झाली.परिषद यशस्वी करण्यासाठी कॉ.दत्ता थोरात,आनंद सैंदाणे,राजु हाके,राजु गायकवाड,अजय मोरे,,राहुल वाघ,गौतम अहिरे,वाल्मीक सुरवाडे,ज्वाला मोरे,सतीश खैरनार,प्रवीण पानपाटील,राकेश अहिरे,मनोज नगराळे,सिद्धांत बागुल,जितेंद्र अहिरे,देवानंद थोरात,महेंद्र शिंदे,सचिन बागुल,शरद वेंदे,विजय वाघ,जेतवन मोरे,ऍड.धम्मदिप सावंत,चेतन अहिरे,किशोर सोनवणे,संदीप बोरसे,हर्ष मोरे,ऍड.अरुण ढीवरे, अतुल बैसाने, शत्रुघ्न शिंदे,राजु बैसाणे,गोकुळ भामरे, मुकेश वाघ,,अमोल शिरसाठ, मुन्ना जपासरे,कन्हैया साखरे,भुषण शिंदे ,राजेश चत्रे, प्रसेनजित जगदेव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला मोरे व आभार प्रदर्शन कॉ.राजू जाधव यांनी केले.


Social Plugin