विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार जयकुमार रावल यांनी भव्य शक्ती प्रदर्शनानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जयकुमार रावल पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रावल यांचे औक्षण करण्यात आले. त्यावेळी आमदार जयकुमार रावल यांच्या शक्ती प्रदर्शनात हजारोंच्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे, उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी माजी खासदार सुभाष भामरे या देखील उपस्थित होते.
शहरातील बिजासनी मंगल कार्यालय येथून आ. जयकुमार रावल यांनी ओपन जिप्सी गाडीमधून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मिरवणुकीने आपले नामनिर्देश पत्र तहसील कार्यालयामध्ये दाखल केले.या मिरवणुकीत शिंदखेडा मतदारसंघातील सर्वच १६३ गावांमधून भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात लाडक्या बहिणींची संख्या देखील मोठी होती.प्रत्येकाने हातात भगवा ध्वज ,आ.रावल यांचे कटआउट हाती घेत आ. जयकुमार रावल यांचा विजय असो , फिर एक बार आ.रावल आमदार अशा जोरदार घोषणा दिल्या. आ.रावल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील महात्मा गांधी चौकात जाहीर सभा झाली.त्यात माजी मंत्री डॉ.सुभाष भामरे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे,भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,तसेच आमदार जयकुमार रावल यांनी उपस्थितांना संबोधीत केले.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती संजीवनी सिसोदे , सोनी कदम, पंकज कदम,रावसाहेब गिरासे,शिंदखेडा गटनेते अनिल वानखेडे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Social Plugin