लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी बालपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार होणे आवश्यक - न्यायाधीश संदीप स्वामी

 


  लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी त्यांच्यावर बालपणापासून चांगले संस्कार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदिप स्वामी यांनी केले.



  महिला व बाल विकास विभागातंर्गत चाचा नेहरु बाल महोत्सवाचा समारोप जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधिश श्री. स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे झाला. यावेळी न्यायाधीश श्री. स्वामी बोलत होते. या कार्यक्रमास महिला बालविकास विभागाचे नाशिक विभागीय उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती उषा साळुंखे, बाल कल्याण समितीच्या सदस्य ॲड. अनिता भांबेरे, श्रीमती सुरेखा पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव, परीविक्षा अधिकारी दिनेश लांडगे, बालसंगोपन संस्थाचालक सुनिल वाघ, शरद पाटील, सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती मनीषा पिंपळे आदी उपस्थित होते.


  न्यायाधीश संदीप स्वामी म्हणाले की, लहान मुलांमध्ये चांगल्या संस्काराची सुरुवात ही आई वडिलानंतर शाळेपासून होत असते. त्यामुळे लहान मुलांना चारित्र्य संपन्न बनविण्यात आई वडीलानंतर शाळेतील शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. आपण जशी लहान बाळाची काळजी जशी घेतो, तशीच काळजी मुलांची घ्यावी, मुलांना योग्य वेळी योग्य दिशा देणे आवश्यक आहे. तसेच मुलांना लहानपणापासूनच मुलींचा, स्त्रीचा सन्मान करणे शिकविणे गरजेचे आहे. जेणेकरुन समाजातील अत्याचार कमी होण्यास मदत होईल. लहान मुलीनीही गुड टच, बॅड टचची तसेच त्यांच्यावर कोणी अत्याचार करीत असल्यास याबाबत त्वरीत माहिती शिक्षकांना द्यावी. शिक्षकांनीही न घाबरता पोलीस किंवा महिला बाल विकास कार्यालयास माहिती द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक 1098 वर कॉल करावा. वसतीगृहात राहणाऱ्या मुला-मुलींवर अत्याचार होणार नाही यांची काळजी शिक्षक तसेच अधिक्षकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


  विभागीय उपआयुक्त श्री. पगारे म्हणाले की, संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नाशिक विभागातील पहिला बाल महोत्सव जळगाव नंतर धुळे, नंदुरबार येथे संपन्न होत आहे. तसेच 15 ते 17 जानेवारी रोजी नाशिक व अहिल्यानगर येथे बालमहोत्सव  होणार आहे. तसेच 25 ते 27 जानेवारी दरम्यान विभागस्तरावर बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. याठिकाणी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावरील बालमहोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे प्रत्येक बालकांनी तसेच पालकांनी आपल्या नातेवाईकामध्ये, परिसरात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठेही बालविवाह संपन्न होत असेल तर त्याची माहिती 1098 टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


  बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ.श्रीमती उषा साळुंखे  म्हणाल्या की, काळ जसा बदलत आहे तसे बालकांचे संगोपन, संवर्धन अवघड होत आहे. त्यांचे प्रमुख कारण म्हणजे कुटूंब व्यवस्था, आजच्या विभक्त कुटूंब व्यवस्थेमकुळे बालक व पालकांची जवळीक दूर होत असल्याने बालसंगोपनामध्ये बालकांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. बालकांच्या शारिरीक, मानसिक गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याने बालके चुकीच्या मार्गाने जातात. तसेच शाळांमध्ये शिक्षकांनीही मुला-मुलींमध्ये होणारे परिवर्तन, मुला-मुलींमध्ये वाढणारी मैत्री लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे त्यांनी सांगितले.


  यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, उंच उडी, लांब उडी, 100 मीटर धावणे, बुद्धीबळ, कबड्डी, फॅन्सी ड्रेस, वैयक्तिक नृत्य मुले-मुली, सांघिक नृत्य, चित्रकला (मतीमंद गट) आदी स्पर्धेमधील विजेत्या प्रथम, द्वितीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना परितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीष जाधव यांनी केले. सुत्रसंचलन शितल जावरे यांनी तर आभार प्रदर्शन मनिषा पिंपळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने निरीक्षणगृह, बालगृहातील विद्यार्थीं, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.