हरित आणि स्वच्छ ऊर्जेचे अंगीकार करून पर्यावरणास स्वच्छ बनवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने संरक्षण क्षमता महोत्सव राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान धुळे जिल्ह्यात विविध जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती भारत पेट्रोलियम कंपनीचे सेल्स मॅनेजर अनिमेश खंपरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांनी धुळे ते सुरत मार्गावर केलेल्या एका दिवसाच्या वाहन सर्वेक्षणाची माहिती देखील दिली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत भारत पेट्रोलियम कंपनीचे हेमंत कुलकर्णी, मॅनेजर अशोक गवळी यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना अनिमेश खंपरिया यांनी सांगितले की, इंधन विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून भारत सरकारने १४ दिवसांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. यात पर्यावरण संवर्धन करण्याच्या उद्देशाने गरज असेल त्याच वेळेस वाहन वापरून इंधन संवर्धन व वापरा संदर्भात युवा पिढीमध्ये जनजागृती केली जाणार आहे. या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई येथे झाले असून देशभरामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. गरज असेल वाहनांचा वापर करून इंधनांची बचत करावी, त्याचप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या निकषात बाद झालेली वाहने वापरू नये, यातून इंधनाची बचत करावी असे आवाहान यावेळी करण्यात आले. तेल विपणन कंपन्या राज्यभरात इंधन संवर्धन संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे. या पंधरवड्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा, वादविवाद स्पर्धा,भिंती चित्र स्पर्धा, इंधन कार्यक्षम, ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख लेखन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यातून इंधन संवर्धनाचा संदेश देणे हा महत्त्वाचा उद्देश असल्याचे खंपरिया यांनी सांगितले . दरम्यान कंपनीच्या माध्यमातून साक्री रोड परिसरात एक सर्वे करण्यात आला असून या २४ तासांमध्ये पंधरा ते वीस हजार गाड्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातील कुंडाणे जवळ वाहनांचा सर्वे केला आहे.या रस्त्यावरून दोन चाकी वाहने ९०२,तीन चाकी वाहने २०६, छोटी कार ५८२, मोठी कार ७८, मोठ्या ट्रक १९०, ट्रक ६६६, बस १५० यांची वाहतूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. अति इंधनांच्या वापरामुळे आज अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी शहरा अंतर्गत आवश्यक असेल त्यावेळी सायकलचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.


Social Plugin