आज आपल्यापैकी बहुतांश जणांना ठिबक सिंचन संचाची माहिती किंवा त्याचे उपयोग संपूर्ण पणे माहीत आहेत असे नाही. बहुतांश लोकांचा समज हा ठिबक म्हणजे पाण्याची बचत एवढ्यापुरताच मर्यादित आहे. अजूनही शेतकरी पारंपारिक पद्धतीने (जमिनीवर/ ब्रॉडकास्ट) खते देतात व त्याचा उपयोग पिकांना फक्त ५०-६०% एवढाच होतो. या पद्धतीत नत्रासारखे खते वातावरणात उडून जातात. आजच्या स्थितीत खतांच्या किमती खूप महाग आहेत व आपल्याला अंदाज येईल की ठिबक संचाद्वारे खते दिल्यास शेतकऱ्यांची खूप बचत होऊ शकते.
आपल्या भारतात ठिबक सिंचन हे १९८६ साली सर्वप्रथम जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड या संस्थेने उत्पादित करून बाजारात आणले व त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत पाणी व खत व्यवस्थापन पोहचवण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रात प्रामुख्याने कापूस, ऊस, द्राक्षे, केळी, डाळिंब, आंबा, संत्रा, पेरू, मोसंबी, लिंबू, पपई, मिरची, टमाटे, बटाटे, भाजीपाला, अद्रक, हळद इत्यादी पिकांसाठी प्रामुख्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. याच बरोबर अलीकडच्या काळात तूर, मका, सोयाबीन या पिकांसाठी सुद्धा ठिबक संचाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच आता रब्बी हंगामातील भात, गहू या पिकांसाठी ठिबक संचाचा वापर होताना दिसत आहे.
तसे पाहता आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत
ठिबक संचाच्या वापराचे महाराष्ट्रात विविध पिकांखाली ३२ लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आहे.
ठिबक पद्धतीत संपूर्णपणे पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जर आपण १००% विद्राव्य खते न वापरल्यास बऱ्याच वेळा ते ठिबक संच चोक होण्याची संभावना असते म्हणजेच असे केले नाही तर
ड्रिपर चोक होतात.
ठिबक सिंचन संचाचे बरेच उपयोग खालील प्रमाणे आहेत-
अ) ठिबक संचाद्वारे खते पाण्याबरोबर पूर्णतः पिकाच्या मुळाशी दिले जातात, खतांची कार्यक्षमता ८०-९०% मिळते.
ब) पाण्यासोबत १००% विरघळणारे खते (विद्राव्य खते) ठिबक द्वारे दिले तर पिकांना सहज शोषण करता येतात व खतांची बचत मोठ्या प्रमाणात होते. आज बाजारात खते खूप महाग आहेत.
क) मजुरांची बचत होते व खते तणाला न मिळता पिकांना मिळतात (दोन ओळीमध्ये मुळांच्या कक्षेबाहेर कमीत कमी पाझरतात) व मुळांच्या कक्षेत उपलब्ध होतात.
ड) हवे तेव्हा हवे तेवढेचं पाणी व खते पिकांच्या मुळाशी गरजेनुसार विभागून देता येतात यामुळे पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही
इ) जमिनीत सतत वाफसा स्थिती ठेवता येते जेणे करून हवा व पाणी यांचे योग्य प्रमाण असल्याने पिकांना त्यांच्या मूळाद्वारे खतांचे योग्य शोषण करता येते.
ई) प्रत्येक पिकास एकसमान पाणी व खते मिळत असल्याने एकसमान वाढ होते व यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ होण्यास मदत होते.
सद्य स्थितीत पिकांची लागवड उंच बेड पद्धतीत होत आहे ज्यामुळे जमिनील हवा व पाणी यांचे संतुलन चांगले राहत असून मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते व पिकांना अन्नद्रव्य शोषण्यात मदत होते.
आज बाजारात अनुदानासाठी आपल्या शासनाच्या भारतीय मानक ब्युरो प्रमाणित ठिबक सिंचन वापरणे गरजेचे आहे.
ज्यांना अनुदानाचा लाभ घ्यावयाचा नाही अशा शेतकऱ्यांसाठी कमी किमतीत काही सुद्धा सुविख्यात कंपन्यांनी कुठलाही परफॉरमंस मध्ये बदल न करता ठिबक सिंचन मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध केलेले आहेत. जो ड्रिपर अनुदानीत ठिबक सिंचनात वापरला जातो तोच ड्रिपर यामध्ये सुद्धा वापरला जातो व ही इनलाईन सुद्धा काही मोठ्या व सुविख्यात / चांगल्या कंपन्या व्हर्जिन मटेरियल पासून बनवतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना याचा एकसमान पाणी व खते देण्यासाठी चांगला फायदा होतो.
जमिनीचा प्रकार, पिकाच्या गरजेनुसार, पाण्याची गुणवत्ता, विजेची उपलब्धता व आपल्या उपलब्ध पंपाच्या फ्लो व हेडनुसार ड्रिपरचा डिस्चार्ज निवडावा.
तसेच दोन रोपातील अंतर व भविष्यातील पिके ( पिक बदल) या नुसार दोन ड्रीपर मधील अंतर निवडावे जेणे करून तेच ठिबक इतर पिकांसाठी सुद्धा त्याच जमिनीत उपयोगात येईल.
याच बरोबर ठिबक सिंचन संचात खालील खत व्यवस्थापनासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत-
अ वेंचुरी - हा सर्वात स्वस्त पर्याय असून यामध्ये पाण्याचा व खतांचा प्रवाह दर एकसमान राहत नाही. वेंचुरी वापरण्यासाठी प्रेशरडिफरन्स निर्माण करावा लागतो त्यामुळे विद्राव्य खते सक्शन प्रेशरने संचात आत खेचली जातात.
ब फर्टिलायझर टैंक - स्वस्त, साधा व सोपा पर्याय परंतु यात एकसमानता पाहिजे तेवढी ठेवता येत नाही. बऱ्याच वेळा खतांचे कॉन्सेंट्रेशन बदलत असते. या पद्धतीत पिकनिहाय
विद्राव्य खते एकत्रित करून दिले जातात. यासाठी एका प्लास्टिक च्या ड्रम मध्ये खते पाण्यात विरघळणारी खते एकत्रित विरघळवून/ विद्राव्य खते मिश्रण करून गाळून दिले जातात
क पिस्टन पम्प - पाण्याचा व खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो त्यासाठी पाण्याचा प्रवाह दाब एकसारखा ठेवावा लागतो कारण हा पाण्याच्या प्रेशर वर अवलंबून असतो.
यासाठी एका प्लास्टिक च्या टाकी मध्ये खते पाण्यात विरघळणारी खते एकत्रित विरघळवून/ विद्राव्य खते मिश्रण करून गाळून दिले जातात
ड इलेक्ट्रिक पम्प (इको मॉडल) -पाण्याचा व खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो त्यामुळे खतांचे कॉन्सेंट्रेशन सुद्धा एकसमान राखण्यास मदत होते व पिकांना एकसमान खते मिळतात. यामध्ये पिकनिहाय खते वेगवेगळ्या टाकीत ठेवता येतात व गरजेप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणात प्रत्येक टाकीतून घेतले जातात व पुढे एकत्रित ठिबक संचात प्रेशरने सोडले जातात.
इ ऑटोमेटेड पम्प (ऑटोमेशन- फर्टिगेशन-
सामू व इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मेज़रमेंट इंस्ट्रूमेंट सह)
-पाण्याचा व खतांचा प्रवाह दर एकसमान राहतो व पाण्याचा सामू व इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मोजता येते. ज्यामुळे सामू व इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त किंवा कमी झाल्यास ती एडजस्ट करता येतात. ही उपलब्धता वरील कुठल्याही घटकात असत नाही. त्यामुळे खतांचे कॉन्सेंट्रेशन सुद्धा एकसमान राखण्यास मदत होते व पिकांना एकसमान खते मिळतात. यामध्ये पिकनिहाय खते वेगवेगळ्या टाकीत ठेवता येतात व गरजेप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणात प्रत्येक टाकीतून घेतले जातात व पुढे एकत्रित ठिबक संचात प्रेशरने सोडले जातात.
परंतु ऑटोमेटेड घटकांची किंमत जास्त असल्याकारणाने लहान क्षेत्रासाठी / सामान्य शेतकऱ्यांना महाग पडते. जर आपले क्षेत्र जास्त असेल तर हा पर्याय नक्कीच फायद्याचा ठरू शकतो कारण किंमत जास्त क्षेत्रावर विभागली जाऊन स्वस्त व चांगला पर्याय ठरतो. तसेच याचा उपयोग ए आय सोबत केल्यास आणखीनच फायदा होऊन उत्पन्नात वृद्धी होऊ शकते.
वरील साहित्यात शेतकरी आपल्या गरजेप्रमाणे व बजेटनुसार योग्य पर्याय निवडतात.
बहुतांश शेतकरी एकाच वेळी वेगवेगळी पिके लागवड करतात. अशावेळी वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या खतांची/ अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. यासाठी वेगवेगळ्या पिकांच्या गरजेनुसार खतांचे वेगवेगळे मिश्रण सेपरेट टाकीत तयार करून ज्या वेळेस त्या-त्या पिकांच्या इरिगेशन करते वेळीस प्रत्येक एरिया नुसार खते द्यावीत.
ठिबक संचाद्वारे खते देताना पिकांची वाढ व गरजेनुसार दररोज विभागून दिली जातात किंवा निदान एक दिवसा आड विभागून दिली पाहिजे. यामुळे खतांची ३० ते ४०% बचत तर होतेच पण उत्पन्नही चांगले येते.
या व्यतिरिक्त वाल्व, फिटिंग्स गरजेप्रमाणे लागतात
आपण जर कसल्याही आमिषाला बळी न पडता जर चांगल्या पर्यायाची निवड केली, व्यवस्थित निगा व देखभाल केली तर नक्कीच याचा फायदा आपणास पिकासाठी बऱ्याच वर्षांपर्यंत होऊ शकतो.
बऱ्याच वेळा शेतकरी स्वस्त / उधार म्हणून ठिबक संच घेतात व एक/ दोन वर्षातच बंद पडतो किंवा एकसमान पाणी देत नाही म्हणून बदलायची वेळ येते व पुन्हा खर्च करावा लागतो.
आपण जर बघितले तर सर्वात जास्त खर्च खतांचा असतो. जर शेतकऱ्यांना ९०% एकसमान पाणी व खते मिळाले तर खूप चांगले तरच पिकांची वाढ एकसमान होऊन एकसमान गुणवत्ता येईल हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

Social Plugin