श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षकपदी सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती



मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य सरकारच्या गृह विभागाकडून मंगळवारी भारतीय पोलीस आणि राज्य पोलीस दलातील १८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेत पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केलेल्या सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन उपविभागांमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले होते. उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. 

संगमनेर येथून बदली झाल्यानंतर सध्या ते दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल (गट क्रं. ५) येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. लवकरच ते श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतील. त्यांच्या नियुक्तीमुळे श्रीरामपूर विभागातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.