शेळावे गावातील गोरगरिबांची ग्रामरोजगार, घरकुल योजेनेचे पैसे हडप करून फसवणूक – ग्राम रोजगार सेवकावर गंभीर आरोप, पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन

 


जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द गावात गोरगरिबांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्राम रोजगार सेवक व सद्या सरपंच पती अमोल राजेंद्र पाटील यांच्यावर रोजगार हमी, घरकुल योजना व इतर शासकीय योजनांमधील निधी हडपल्याचे, तसेच जातीवाचक शिवीगाळ व धमक्या दिल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


याबाबत अट्रॅसिटी ऍक्ट नुसार पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपीना अटक नझाल्याने येथील महिलांनी आझाद समाज पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काल पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. 

अर्जदार पमाबाई उर्फ आशाबाई एकनाथ भील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार –

गरीब वंचित महिलांकडून घरकुल, रोजगार हमी योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी १० ते १५ हजार रुपये रोख घेण्यात आले.मात्र लाभ न देता संबंधित निधी आरोपींनी हडपल्याचा आरोप.

नागरिकांच्या बँक खात्यात आलेले घरकुल योजनेचे पैसे देखील परस्पर काढून घेतले.

विरोध करणाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

३ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत महिलांनी विचारणा केली असता, आरोपींनी महिलांना सभेतून बाहेर काढत अश्लील व जातीय शिवीगाळ केली.

 तक्रारीनंतरही कारवाईचा अभाव

८ ऑगस्ट रोजी पारोळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे.

या गंभीर प्रकरणात आरोपींवर तातडीने गुन्हा नोंदवावा, सखोल चौकशी करून जबाबदार शासकीय अधिकारी व राजकीय कार्यकर्त्यांवरही कारवाई व्हावी, तसेच पीडितांना संरक्षण मिळावे, अशा मागण्यांचे निवेदन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.

 या प्रसंगी आझाद समाज पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.