निंभोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – १२ लाखांचा चोरीचा माल हस्तगत, १० गुन्ह्यांचा पर्दाफाश

 



रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने शेती उपयोगी साहित्य, तोलकाट्यावरचे बॅटरी-इन्व्हर्टर, मोटार सायकली, कार इत्यादी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत १० गुन्हे उघडकीस आणले गेले असून, अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.


गेल्या काही दिवसांपासून निंभोरा, सावदा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर परिसरातील शेतकरी वर्गाचे शेती साहित्य, मोटारसायकल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरीस जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास बोचरे यांनी पथकासह मागील १५ दिवसांपासून काटेकोर नाकाबंदी, रात्रगस्त आणि तांत्रिक तपास सुरू केला होता.


दि. ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता संशयित आरोपी विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे (रा. वडगाव नदीकाठी) याच्या झोपडीवर छापा टाकला असता, तो पसार झाला. मात्र झोपडीतून योगीता सुनिल कोळी ही महिला मिळून आली. चौकशीतून आरोपीने साथीदारांच्या मदतीने चोरी केलेला माल स्वप्नील चौधरी (रा. निंभोरा) याला विकल्याचे उघड झाले. चौधरीच्या घर व गोडाऊनवर छापा टाकून बॅटऱ्या, इन्व्हर्टर मशिन, शेती साहित्य, मोटारसायकली, कार, पावर ट्रोलर, सोलर प्लेटसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला.


🔹 मुख्य आरोपी व त्यांचे साथीदार


१) विलास ऊर्फ काल्या वाघोदे (रा. वडगाव नदीकाठी, फरार)

२) सौ. योगीता सुनिल कोळी

३) गोपाळ संजय भोलनकर

४) आकाश मधुकर घोटकर

५) अर्जुन रतनसिंग सोळंकी

६) जमील अब्दुल तडवी

७) स्वप्नील वासुदेव चौधरी

८) राकेश सुभान तडवी

९) ललित सुनिल पाटील

१०) राहुल ऊर्फ मयुर अनिल पाटील


या आरोपींकडून एकूण १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल – ११ मोठ्या बॅटऱ्या, ३ लहान बॅटऱ्या, ७ इन्व्हर्टर मशिन, ५ शेती पंप मशिन, ४ मोटारसायकली, २ पावर ट्रोलर, १ नॅनो कार, २ सोलर प्लेट, ११ मटेरीयल बॅग, ठिबक नळ्या व अन्य साहित्य असा मोठा माल जप्त करण्यात आला.


🔹 उघडकीस आलेले गुन्हे

निंभोरा पो.स्टे. – ५

यावल पो.स्टे. – २

रावेर पो.स्टे. – १

मुक्ताईनगर पो.स्टे. – १

सावदा पो.स्टे. – १



👉 एकूण – १० गुन्हे उघडकीस


🔹 कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


सदर मोहिमेत सपोनि हरीदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली मपोउनि दिपाली पाटील, मपोउनि ममता तडवी यांच्यासह निंभोरा पोलीस स्टेशनचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मिळून ही धडाकेबाज कामगिरी केली.


या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढला असून, “निंभोरा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी” म्हणून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.