प्रतिनिधी | जळगाव
ज्येष्ठ विधिज्ञ, पद्मश्री व राज्यसभा खासदार अँड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासात सावलीप्रमाणे साथ देत, त्यांच्या लौकिकप्राप्त कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सौ. ज्योतीताई निकम यांना ग्रामगौरव फाउंडेशनतर्फे ‘साक्षलक्ष्मी’ सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी खासदार अँड. उज्ज्वल निकम, जिल्हा बँकेच्या संचालिका शैलेजादेवी निकम व राज्य पणन मंडळाचे उपाध्यक्ष रोहीत निकम उपस्थित होते.
‘नानात्वेन सुदृढ: समाज!’ या ध्येयवाक्याप्रमाणे ग्रामगौरव फाउंडेशन राज्यभर विविध उपक्रम राबवत आहे. यंदा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जळगाव व पुणे जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच मंत्र्यांच्या सौभाग्यवतींना ‘साक्षलक्ष्मी’ म्हणून गौरविण्याचा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे, उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे व सचिव सुभाष मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्याध्यक्षा कु. धनश्री ठाकरे व संस्थेतील महिलांनी घरपोच जाऊन साडी, खण, नारळाने ओटी भरत ‘साक्षलक्ष्मी’ गौरवचिन्ह प्रदान करण्याची ही उपक्रमशृंखला सुरू केली आहे.
अँड. उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या कामगिरीत मुंबई बॉम्बस्फोट खटला, २६/११ हल्ला प्रकरण, कोपर्डी प्रकरणातील युक्तिवादातून दोषींना शिक्षा मिळवून दिल्याची उल्लेखनीय नोंद आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत सदैव खंबीर उभी राहिलेल्या ज्योतीताई निकम यांच्या योगदानाची दखल घेऊन नवरात्र घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी त्यांना हा सन्मान देण्यात आला.
घरी जाऊन साधेपणात कार्यक्रम :
कोणताही बडेजाव न करता, कौटुंबिक वातावरणात थेट अँड. निकम यांच्या निवासस्थानी हा सन्मान कार्यक्रम पार पडला. ग्रामगौरव फाउंडेशनचे दस्तगीर खाटीक, गौरव रणदिवे, योगेश भोई, संजय निकुंभ, प्रकाश पवार, रजनी पवार, अरुण इंगळे, दीपा बाणाईत, शीतल वाघ आदी या उपक्रमात सहभागी झाले.

Social Plugin