रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी (दि. 09 ऑक्टोबर 2025) सकाळी मोठी धडक कारवाई करत मोरव्हाळ (ता. रावेर) येथील शेतात लागवड केलेली तब्बल 171 किलो वजनाची गांजाची शेती उध्वस्त केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सकाळी पोलिस अधिकारी, अंमलदार व फॉरेन्सिक पथकाने मोरव्हाळ शिवारातील आरोपी युसुफ अकबर तडवी (वय-50, रा. मोरव्हाळ) याच्या शेतावर छापा टाकला. तपासणीदरम्यान तुरीच्या पिकाच्या आड लपवून ठेवलेली कैनाबिस (गांजा) सदृश अंमली पदार्थाची 172 झाडे मिळून आली. या झाडांचे वजन 171 किलो एवढे असून, बाजारभावानुसार त्याची किंमत तब्बल ₹17 लाख इतकी आहे.
सदर शेत दुर्गम भागात असल्याने पोलीस पथकाने तब्बल 3 किलोमीटर परिसर पिंजून काढला. खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. आरोपीविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल, पोउपनिरी तुषार पाटील, पोउपनिरी मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील पोना कल्पेश आमोदकर, पोकों प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील तसेच पाल क्षेत्राचे पोहेकाँ ईश्वर चव्हाण, पोहेकाँ जगदीश पाटील, पोकों इस्माईल तडवी, गजाजन बोणे, कुंदन नागमल, चालक पोहेका गोपाळ पाटील यांनी सहभाग घेतला.
रावेर पोलीसांच्या या कारवाईमुळे गांजा तस्करांना मोठा धक्का बसला असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या धाडसी पावलाचे स्वागत केले आहे.

Social Plugin