वरणगाव येथे अवैध शस्त्रासह आरोपी जेरबंद

 


जळगाव :

जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. आगामी सण-उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.


त्याअन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वरणगाव शहरातील तिरंगा चौकात आरोपी संजय गोपाळ चंडेले (वय ५०, रा. दर्यापूर शिवार, ऑर्डनेंस फॅक्टरी, वरणगाव) हा विनापरवाना शस्त्र घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांचे पथक तयार करून वरणगाव येथे रवाना केले.


बुधवारी रात्री सुमारे ११.३० वाजता तिरंगा चौक परिसरात गुप्त पथकाने छापा टाकला असता झाडाजवळ उभ्या असलेल्या संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एकूण ₹५०,५०० किंमतीची दोन गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.


या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. २१३/२०२५, आर्म्स अॅक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ सुभाष सपकाळ करीत आहेत.


यापूर्वीही आरोपी संजय चंडेले याच्यावर वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स अॅक्ट अंतर्गत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे :

गुन्हा रजि. नं. ०२/२०२२

गुन्हा रजि. नं. २८/२०२२

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.उ.नि. शरद बागल, पो.उ.नि. रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना विकास सातदीवे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकों प्रशांत परदेशी, पोकों राहुल वानखेडे तसेच चापोकों भारत पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.