जळगाव – शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून झालेल्या धक्कादायक हल्ल्यात एका तरुणाचा प्राण घेण्यात आला. ही घटना शुक्रवारी (३ ऑक्टोबर) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली.
मयत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील (वय २७, रा. कासमवाडी) असे आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटील याचा परिसरातील काही तरुणांशी जुना वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री तो कासमवाडी येथील एकता मित्र मंडळाजवळ उभा असताना दोन तरुणांनी त्याच्यावर तलवार आणि कोयत्याने तुफान हल्ला चढवला. पोट आणि मांडीवर गंभीर वार झाल्याने तो रक्तबंबाळ झाला.
कुटुंबीयांनी त्याला तातडीने खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश उसळला होता.
दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शहरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Social Plugin