शिवसेनेला मोठा धक्का! दोन माजी महापौरांसह अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश

 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकारणात मोठी हलचाल झाली आहे. दोन माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेची जोरदार लाट उसळली आहे. या प्रवेशामुळे शिवसेना (उबाठा गट) ला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.



गेल्या काही दिवसांपासूनच शिवसेना-उबाठा गटातील काही ज्येष्ठ पदाधिकारी भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. गुरुवारी प्रवेश निश्चित झाला होता, मात्र जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे हा सोहळा शुक्रवारी पार पडला.

आज जी.एम. फाउंडेशन येथे मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर जयश्री महाजन, माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान बाजार समिती सभापती सुनील महाजन आदींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला.

या वेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, डॉ. केतकी पाटील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

प्रवेशानंतर जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.