भुसावळ : तालुका पोलिसांनी तब्बल २५.४२ लाख रुपयांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश करून सहा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे, लुटीचा मुख्य सूत्रधार हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेला शाहीद वेग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मोहम्मद यासीन इस्माईल हे आपल्या कार्यालयातील २५ लाख ४२ हजार रुपयांची बॅग मोटारसायकलने घरी नेत होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला धक्का देऊन तोल जाऊ दिला आणि बॅग हिसकावून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत फिर्यादीच्या कंपनीतील ड्रायव्हर शाहीद वेग याच्यावर संशय आला. चौकशीदरम्यान त्यानेच लुटीचा कट रचल्याची कबुली दिली. शाहीदने अकाउंटंट यासीन शेख यांच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती आपल्या साथीदारांना — मुजाहीद मलीक, मोहम्मद दानिश, अजहर मलक, अमीर खान आणि ईजहार बेग — यांना दिली होती. याच टोळीने लुटीची योजना आखून गुन्हा केला.
तपासात आरोपींनी संगनमत करून दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाल्याने भा.दं.वि. कलम ३१०(२) अंतर्गत दरोड्याचे कलम वाढविण्यात आले आहे. पोलिसांनी सर्व सहा आरोपींना दि. ३१ ऑक्टोबर रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
मुख्य सूत्रधार शाहीद वेग याच्यावर मलकापूर व बोराखेडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे आहेत, तर आरोपी अमीर खानवर रावेर ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, महेश गायकवाड आणि राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक रवी नरवडे, हवालदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी आदींचा समावेश होता.
या उत्कृष्ट तपासामुळे भुसावळ पोलिसांनी पुन्हा एकदा आपली दक्षता आणि तपास कौशल्य सिद्ध केले आहे.


Social Plugin