जळगाव प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटारसायकली व शेतकऱ्यांच्या विहिरीतील पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर गजाआड केले आहे. या टोळी कडून तब्बल १ मोटारसायकल आणि २९ पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हातगाव येथून एका शेतकऱ्याची हिरो स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत गु.र.नं. ३०८/२०२५ भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या सूचनेनुसार तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या १) सोमनाथ उर्फ लंगड्या रघुनाथ निकम (रा. अंधारी), २) सुधीर नाना निकम (रा. महारवाडी) आणि ३) सम्राट रविंद्र बागुल (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) या तिघांनीच दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.
या आरोपींकडून सखोल तपास केला असता त्यांनी चाळीसगाव, हातगाव, अंधारी, रोहीणी (ता. चाळीसगाव) तसेच नांदगाव (जि. नाशिक) परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीतून पाणबुडी मोटारी चोरी करून विकल्याचे उघड झाले. आरोपींच्या कबुलीजबाबावरून पोलीस पथकाने ११ पाणबुडी इलेक्ट्रीक मोटारी जप्त केल्या.
त्यानंतर आरोपींना न्यायालयीन पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुढील चौकशीत आणखी १८ पाणबुडी मोटारी हस्तगत करण्यात आल्या. अशाप्रकारे आरोपींकडून एकूण १ मोटारसायकल व २९ पाणबुडी मोटारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि. शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही यशस्वी मोहीम पो.उ.नि. शेखर डोमाळे, पो.कॉ. महेश पाटील, भूषण शेलार, सागर पाटील, बाबासाहेब पाटील, तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सफौ. युवराज नाईक, पोहेकॉ. गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, संदीप पाटील, तुकाराम चव्हाण व विजय पाटील यांनी संयुक्तपणे राबवली.
पोलीस प्रशासनाने चाळीसगाव व नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, जर कोणाच्या शेतातून पानबुडी मोटारी चोरी गेल्या असतील, तर त्या ओळख पटवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.

Social Plugin