वाराणसीतून चोरी प्रकरणातील आरोपी जळगाव पोलिसांच्या ताब्यात २०१७ मधील सोन्याच्या चोरीचा गुन्हा उकल; १० तोळे सोने जप्त

 




जळगाव (प्रतिनिधी) :

रामानंद नगर पोलिसांनी तब्बल आठ वर्षांपूर्वी झालेल्या सोन्याच्या चोरीचा गुन्हा उकलत पश्चिम बंगालमधील फरार आरोपीला वाराणसी (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेत १० तोळे सोने जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जुन्या प्रकरणातील महत्त्वाचा तपास सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० मार्च २०१७ रोजी फिर्यादी सचिन वसंतराव भामरे (रा. आर.एल. कॉलनी, गांधी नगर, जळगाव) यांच्या साई ज्वेलर्स या पिंप्राळा परिसरातील दुकानात काम करणारा सुशांत सुनिल कुंडु (रा. नस्कर पारा, संत्रागाच्छी, जि. हावडा, पश्चिम बंगाल) या कामगाराने दागिने तयार करण्यासाठी दिलेल्या सुमारे ३० तोळे सोन्याचा अपहार करून मुळगावी पळ काढला होता.


या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२/२०१७ भादंवि कलम ४०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी वारंवार केला, मात्र तो हाती लागत नव्हता.


अखेर सपोनि भूषण कोते यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपीला वाराणसी येथे अटक करण्यात आली. त्याच्याकडून चौकशीत पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथून सुमारे १० तोळे (१०० ग्रॅम) वजनाचे आणि अंदाजे ११ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले. आरोपीस १३ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


यांनी केली कारवाई

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या देखरेखीखाली, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, एपीआय भूषण कोते, हवालदार जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक योगेश बारी, अनिल सोननी आणि अतुल चौधरी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.