जळगाव – प्रतिनिधी
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) दुपारी सुमारास १२.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा, ता. यावल) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस (क्रमांक एमएच-१४ बीटी-२३०६) ही जळगावकडून भुसावळच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. बस नशिराबाद टोल नाक्याजवळ पोहोचताच तिच्या समोरील चाकांपैकी एक टायर अचानक फुटले.
त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस भरकटून टोल नाक्याजवळील भिंतीवर जाऊन आदळली.धडकेच्या जोरात साराबाई भोई या बसच्या खिडकीतून बाहेर फेकल्या गेल्या आणि दुर्दैवाने बसच्या मागील चाकाखाली येऊन चिरडल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि टोल नाक्याजवळील वाहनचालकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य सुरू केले.अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासोबतच पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवला.
मृत साराबाई भोई या डोळ्यांची तपासणी करून जळगाववरून आपल्या पाडळसा येथील घरी परतत होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि तीन मुले असा परिवार आहे.

Social Plugin