जळगाव जिल्हा कारागृहात बुधवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी बॅरेक क्रमांक २ मध्ये दोन बंदी गटांमधील वैर पुन्हा उफाळून आले. या वादातून चार बंदींनी एका तरुण बंदीवर टणक वस्तूने हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे कारागृहातील सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हल्ल्यात जखमी झालेला बंदी तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) हा एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. दुपारी सुमारे चारच्या सुमारास तो बॅरेकमध्ये विसावलेला असताना, त्याच ठिकाणी असलेल्या चार बंदींनी त्याला अचानक घेरले. या आरोपींमध्ये पराग रविंद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू गागले, भूषण विजय माळी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण या बंदींचा समावेश आहे.
प्रथम त्यांनी तेजसला शिवीगाळ करत धमकावले. “तू भूषण माळीचा विरोधक आहेस, त्याच्याशी विरोध का ठेवतोस?” असे म्हणून त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. चौघांनी मिळून त्याच्या डोक्याच्या मागील भागावर टणक वस्तूने प्रहार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यावेळी आरोपींनी त्याला जीव घेण्याचीही धमकी दिली.
घटनास्थळी तत्काळ हजर झालेल्या जेल शिपायांनी हस्तक्षेप करत मारहाण थांबवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. गंभीर जखमी अवस्थेत तेजस सोनवणे याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
या घटनेनंतर रात्री साडेनऊच्या सुमारास जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पराग आरखे, बबलू गागले, भूषण माळी आणि सचिन चव्हाण या चार बंदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Social Plugin