सोने चोरी प्रकरण उघडकीस – आरोपी अटकेत, १३ लाख ९९ हजारांचे सोने जप्त


जळगाव (प्रतिनिधी) :

बालाजी पेठ येथील लक्ष्मीनारायण ज्वेलर्समध्ये झालेल्या सोन्याच्या चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. जयनगर, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) यास अटक करून तब्बल १३ लाख ९९ हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

घटना ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.३० ते ४.१२ या वेळेत घडली. सोने कारागीर निखिल कैलास गौड यांच्या ज्वेलरी दुकानाचे कुलूप तोडून आरोपीने प्रवेश केला होता. त्यानंतर कारागीर सुदर्शन माल याच्या कामाच्या लाकडी ड्रॉवरचे कुलूप फोडून १२४.०६ ग्रॅम वजनाचे सोने चोरून नेले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासणीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. आरोपी हैद्राबादला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला ४ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीसाठी वापरलेली कात्री, पक्कड व एक्झाब्लेडही जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,  अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्रीमती कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत एपीआय साजिद मंसुरी, पीएसआय योगेश ढिकले, पोहेकॉ. अल्ताफ पठाण, प्रदीप नन्नावरे, योगेश जाधव, योगेश साबळे, निलेश घुगे, अमोल वंजारी, नवजीत चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोकों गौरव पाटील यांनी सहभाग नोंदविला.

सदर आरोपीस न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिला असून पुढील तपास सुरू आहे.