राष्ट्रवादी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच - माजी आमदार फारुक शाह

 




महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काल अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक धुळे येथील गुलमोहोर शासकीय  विश्रामगृहात घेण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी, सुकाणु समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार फारुक शाह यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर बैठकीत सुकाणू समितीच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार प्रा. शरद पाटील, शामकांत सनेर , कार्याध्यक्षपदी जोसेफ मलबारी , सरचिटणीसपदी अनिल मुंदडा, सदस्यपदी सुनील नेरकर, गणेश जाधव, कांतीलाल दाळवाले, दिपा नाईक , यांची निवड करण्यात आली 

यावेळी कैलास चौधरी, महेंद्र शिरसाठ, तसेच उमेश महाजन, आनंद सैंदाणे, शिवाजी लंगोटे , डॉ .सरफराज अन्सारी, रईस काझी, पै. रवींद्र आघाव , आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या सुकाणू समितीचे उपाध्यक्ष प्रा. शरद पाटील म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादा पवारांचा पक्ष आहे.या पक्षात माझ्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. जुन्यासह नवीन पदाधिकारी आहेत. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा आणून आपल्याला अजित पवारांना एक रिझल्ट द्यायचा आहे. मला समितीत घेतल्याबद्दल मी आभारी आहे . पण समितीत पदावर काम न करता कार्यकर्ता म्हणून काम करायचे आहे. पदांमध्ये मला अडकवू नका. माझ्यापेक्षा अन्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी असे माझे म्हणणे आहे. त्यावर सुकाणू समितीच्या बैठकीला बंद खोलीत सुरुवात करण्यात आली.अवघ्या १४ मिनिटात बैठक आटोपल्या नंतर सुकाणू समितीत प्रा. शरद पाटील यांच्या विनंतीवरून आणखी दोघा सदस्यांची नियुक्ती केली गेली. त्यात कैलास चौधरी आणि महेंद्र शिरसाठ यांचा समावेश करण्यात आला. एकंदरीत अवघ्या १४ मिनिटांच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. माजी आमदार फारुक शाहांनी दिला स्वबळाचा नारा बंद खोलीतील बैठकीनंतर सुकाणू समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार फारुक शाह म्हणाले, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीत महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. आमचे नेते ना. अजितदादा पवार हे शिव, शाहू , फुले यांच्या विचारांवर काम करतात. तेच काम आम्ही जनतेपर्यंत घेवून जाणार आहे. आमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही महापालिकेची निवडणूक स्वबळावरच लढविणार आहोत. पक्षाचे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्या आदेशानुसारच काम होईल. तथापि महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढण्यासही सज्ज आहोत. मागील तीन महिन्यापूर्वी इथली कार्यकारणी बरखास्त झालेली होती. शहराध्यक्ष पदाची जबाबदारी कोणावरही नाही. निवडणुकीनंतर शहर जिल्हाध्यक्षाची निवड होईल . जिल्ह्याची जबाबदारी सुरेश सोनवणे यांच्याकडे आहे. निवडणुकीसाठी तात्पुरती जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आलेली आहे. इतकेच नाही तर सुकाणू समितीत माझ्यासह ११ सदस्य आहेत. समिती आता पूर्ण शहरात काम करेल. 

अल्पसंख्यांक बहुल भागात आम्ही पूर्ण ताकदीनीशी जागा लढविणार आहोत. मित्र पक्षाकडून जर काही जागा सोडण्याची विनंती करण्यात आली तर कशी तडजोड करायची त्याचा विचार केला जाईल. 

प्रा. शरद पाटील यांनी पदाचा राजीनामा दिलेला नाही त्यांची अशी इच्छा होती की आणखी एक दोन जणांना वाढवून घ्या, त्यांची मागणी मान्य करून आणखी दोन सदस्यांची निवड करण्यात आली. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. सुकाणू समिती ही तात्पुरता आहे. सर्वांना विश्वासात घेवून निवडणुकीची रणनीती ठरविणार आहोत. महापौर आमचा राहील.असा विश्वासही माजी आ.शाह यांनी शेवटी व्यक्त केला.