वंचितला मोठे खिंडार — दोन्ही माजी जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश

 


भुसावळ (जळगाव), २२ नोव्हेंबर २०२५ — संतोषी माता हॉल येथे वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्ह्याचे दोन्ही माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे (पूर्व) व प्रमोद इंगळे (पश्चिम) यांच्यासह बहुजन समाज पार्टी (बसपा), शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी तसेच इतर पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी आज मोठ्या जल्लोषात रिपब्लिकन सेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा मा. ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रमुख नेते म्हणून — माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व प्रमोद इंगळे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, देवदत्त मकासरे (मेजर), हेमंत सोनवणे (वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणी सदस्य), गौतम पवार (तालुकाध्यक्ष, पारोळा), वाल्मिक लोखंडे (जिल्हा सचिव बसपा, भडगाव), शत्रुघ्न नेतकर (बसपा, चाळीसगाव), सारिपुत्र गाढे, दीपक इंगळे (मुक्ताईनगर), प्रशांत तायडे (न्हावी), हमीद शहा (फैजपूर), दिलीप भालेराव (भुसावळ) यांचा समावेश होता.


याशिवाय वंचित बहुजन आघाडी, बसपा, मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनीही रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू ॲड. अमन आंबेडकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव विनोद काळे, उत्तर महाराष्ट्र नेते प्रा. डॉ. विजय घोरपडे आदी उपस्थित होते.


प्रवेश सोहळ्यात भाषण करताना ॲड. अमन आंबेडकर म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील बहुजन समाज एका नव्या आशेच्या दिशेने पुढे जात आहे. दशकानुदशक बहुजनांना फसवणाऱ्यांना सोडून तुम्ही रिपब्लिकन सेना स्वीकारली, ही खरी आंबेडकरी क्रांती आहे. आगामी निवडणुकांत रिपब्लिकन सेना बहुजनांचा आवाज ठामपणे मांडणार आहे.”


प्रदेश सचिव विनोद काळे म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्ते बदलाची वाट पाहत होते. आजचा प्रवेश सोहळा त्या संघर्षाचा परिणाम आहे.” प्रस्ताविकेत विनोद सोनवणे यांनी आगामी दिवसांत सर्व तालुक्यांत असेच मोठे प्रवेश सोहळे होणार असल्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिपुत्र गाढे यांनी केले. सभेला बहुजन समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.

या वेळी रिपब्लिकन कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी प्रमोद इंगळे यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली व ॲड. अमन आंबेडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच रिपब्लिकन सेना जळगाव जिल्हाध्यक्षपदी विनोद सोनवणे यांच्या नावाचीही जाहीर घोषणा करण्यात आली. आभार प्रदर्शन प्रमोद इंगळे यांनी मानले.

या भव्य प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार पडले असून, नाराज दोन्ही माजी जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.