मनसेकडून शहरातील अस्वच्छ परिसराविरोधात निवेदन – तीन दिवसांत कारवाई न झाल्यास प्रतीकात्मक निषेधाची चेतावणी

 


जळगाव –शहरातील प्रमुख आकाशवाणी चौक, इच्छा देवी सर्कल आणि अजिंठा चौफुली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या गवत, झुडपे आणि जंगली झाडांमुळे परिसर विद्रूप व अस्वच्छ झाला आहे. या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जळगाव शहराच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांना निवेदन देऊन तातडीने साफसफाईची मागणी करण्यात आली.

मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, “आकाशवाणी चौक हा शहरातील अत्यंत महत्वाचा आणि गर्दीचा चौक असून, येथून दररोज अधिकारी, उद्योजक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. अशा ठिकाणाची दुर्दशा ही शहराच्या सौंदर्यावर डाग ठरणारी आहे.”

मनसेने पुढील तीन दिवसांत परिसराची साफसफाई न केल्यास प्रतीकात्मक निषेध म्हणून त्या ठिकाणी बकऱ्या चारण्यात येतील, असा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी नागरिकांमध्ये अपेक्षा आहे.

दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले की, “सदर सर्कल हे शहराच्या हद्दीत येते, त्यामुळे त्याची स्वच्छतेची जबाबदारी जळगाव महापालिकेची आहे. या संदर्भात मनसेला अधिकृत पत्र देण्यात येईल.”

या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, ॲड. सागर शिंपी, विकास पाथरे आणि दीपक राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.