जळगाव (प्रतिनिधी) – आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून निवडणूक लढविण्याचा निर्धार करत इंजि. गिरीश कैलास भोळे यांनी प्रथम भारतीय जनता पक्ष कडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली होती. मात्र भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अखेर अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग ११ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वाढली असून, स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे.
इंजि. गिरीश भोळे हे जळगाव शहरात सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक क्षेत्रात परिचित असलेल्या भोळे परिवाराचे प्रतिनिधी आहेत. ते कै. किरण पंडितराव भोळे (माजी नगरसेवक) यांचे पुतणे असून, भोळे परिवाराने शहराच्या सामाजिक-धार्मिक तसेच विकासात्मक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
त्यांचे वडील कैलास पंडितराव भोळे हे म्हाळसादेवी देवी संस्थानचे अध्यक्ष असून, धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. तसेच पोस्टल कॉलनी येथील श्री हरी मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध विकासात्मक कामे मार्गी लावली आहेत. जागृती हौसिंग सोसायटीतील मारुती मंदिराच्या उभारणीसाठीही भोळे परिवाराचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
कुटुंबातील सामाजिक सेवेची परंपरा पुढे नेत कोविड काळात त्यांची बहीण डॉ. पूजा कैलास भोळे (MBBS) यांनी रुग्णसेवा केली, तर भाऊ डॉ. भाग्येश कैलास भोळे (MBBS) वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच मोठे काका सुनील पंडितराव भोळे हे मनपा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
स्वतः इंजिनियर असलेले इंजि. गिरीश भोळे हे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी कार्य करत आहेत. प्रभाग क्रमांक ११ मधील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भाजपकडून उमेदवारी मिळाली नसली तरी सामाजिक-धार्मिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आणि तरुण नेतृत्वाचा अनुभव लक्षात घेता, इंजि. गिरीश भोळे यांची अपक्ष उमेदवारी प्रभाग ११ मधील निवडणूक रंगतदार करणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Social Plugin