प्रभाग क्र. १५ मधून रोहित सुरेश भाट यांची भाजपकडे उमेदवारीची मागणी


जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मधून रोहित सुरेश भाट यांनी भारतीय जनता पक्षाकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे प्रभागात राजकीय चर्चांना उधाण आले असून, “यावेळी भाजप उमेदवारीचा विचार करेल का?” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

वडील सुरेश भाट यांचा दीर्घ पक्षप्रवास.

रोहित भाट यांचे वडील सुरेश भाट हे सन १९९२ पासून भारतीय जनता पक्षात सक्रिय असून गेल्या ३३ वर्षांपासून त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे. त्यांनी भाजप महानगर शहर उपाध्यक्ष, महानगर सरचिटणीस तसेच भाजप भटक्या-विमुक्त आघाडीचे तब्बल पाच वेळा महानगर अध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. याशिवाय ते कंजर भाट समाजाचे प्रदेश अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

सामाजिक व धार्मिक कार्यात मोलाचे योगदान

सुरेश भाट सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असून विविध सामाजिक उपक्रम, गरजू व गोरगरिबांना मदत, तसेच धार्मिक कार्यांना सातत्याने हातभार लावण्याचा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे. त्याच सामाजिक वारशातून रोहित भाटही गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसारख्या सार्वजनिक उत्सवांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात.

समाजाची अपेक्षा आणि उमेदवारीची मागणी

या प्रभागात कंजर भाट समाजासह नाथ समाज, जोशी-गोंधळी समाज, बुनकर समाज, चर्मकार समाज, मातंग समाज, कमाठी समाज आदी घटक मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, गेल्या अनेक वर्षांपासून हा संपूर्ण समाज भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मात्र आजपर्यंत या समाजातील एकाही प्रतिनिधीस भाजपकडून उमेदवारी मिळालेली नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सुरेश भाट यांचे चिरंजीव रोहित भाट यांनी भाजपकडे प्रभावी उमेदवारीची मागणी केली असून, समाजातही त्यांना संधी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

उमेदवारी मिळणार का? प्रभागात उत्सुकता

दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी तसेच जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजुमामा भोळे व पक्षश्रेष्ठी या सर्व बाबींची दखल घेऊन रोहित भाट यांना उमेदवारी देतील का, याबाबत प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.