पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; १२ तासांत मोबाईल चोर जेरबंद

 


पाचोरा – पाचोरा पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत मोबाईल चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला असून आरोपीस अटक करून चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील दोषारोपपत्र देखील १२ तासांत मा. पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १५.२५ वाजता फिर्यादी किशोर आनंदराव नरेराव (वय ३९ वर्षे, व्यवसाय – स्वीट व कोल्ड्रिंक्स विक्रेता, रा. ह.मु. कृष्णपुरी, पाचोरा, मुळ रा. निंभोरी, ता. पाचोरा) हे त्यांच्या चारचाकी वाहनात मोबाईल पॉवर बँकला चार्जिंगसाठी लावून बाहेर असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांचा मोबाईल फोन चोरी करून नेला.

या घटनेबाबत फिर्यादी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरून गु.र.नं. २१/२०२६, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ हाती घेतला. पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ/०३८५ अशोक रामचंद्र हटकर, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ/१८८५ संदीप किसन भोई यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला.

तपासादरम्यान संशयित इसम फिरत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव सौरभ नाना भिल (गायकवाड), वय २५ वर्षे, रा. कळमसरे, ता. पाचोरा, जि. जळगाव असे सांगितले. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने सदर मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच पहूर पोलीस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारचा मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याची माहिती समोर आली.

तपासात आरोपीकडून

१५,००० रुपये किंमतीचा फिकट निळ्या रंगाचा शाओमी कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल,

५,००० रुपये किंमतीचा विवो Y27 Pro मोबाईल,

असा एकूण ३०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात आरोपीस अटक करून अवघ्या १२ तासांत मा. पाचोरा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपीस पुढील कारवाईसाठी धुळे सब-जेल येथे पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.

ही यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.