पोदार इंटरनॅशनल स्कुल, जळगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी.

 


जळगाव प्रतिनिधी- पोदार इंटरनॅशनल स्कुल, जळगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती अत्यंत उत्साह, अभिमान आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या प्रसंगी जळगाव शहरातील प्रसिद्ध शिवशाहीर श्री. संकेत गांगुर्डे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. “जय भवानी – जय शिवाजी” या घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय तुषार साळुंखे, स्वरा फडके आणि कृतिका चौधरी या विद्यार्थ्यांनी प्रभावी शब्दांत करून दिला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य श्री. गोकुळ महाजन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.

इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर कु. कुशल तळेले यांनी इंग्रजी भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील शौर्य, दूरदृष्टी, संघटनकौशल्य व प्रशासनशैली या विविध पैलूंवर आधारित प्रभावी भाषण सादर केले.

इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘शिवरायांची शौर्यगाथा’ या विषयावर पोवाडा सादर करून उपस्थितांमध्ये वीररस जागवला. तसेच इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य-नाटिकेतून पावनखिंडीचा थरारक प्रसंग, बाजीप्रभूंचे वीरमरण आणि संपूर्ण शिवचरित्र जिवंतपणे साकारण्यात आले. बाल शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज असा जीवनप्रवास विद्यार्थ्यांनी रंगमंचावर प्रभावीपणे उभा केला.

प्राचार्य श्री. गोकुळ महाजन यांनी आपल्या मनोगतात महाराजांच्या विविध बिरुदांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांमध्ये अभिमानाची भावना जागृत केली. त्यांनी महाराजांचा सेनेवरील विश्वास, सर्वधर्मसमभाव, स्त्रीसन्मान आणि सुशासनाचा आदर्श यांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे,” असे ते म्हणाले.

यावेळी शाळेत दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्रे, जगदंबा तलवारीची लहान प्रतिकृती, छत्रपती संभाजी महाराज यांची चित्रे, शिवराज्याभिषेकाची कागदपत्रे, महाराजांचा पहिला फर्मान, पुरंदरच्या तहाचे हस्तलिखित, बाजीप्रभूंना लिहिलेले पत्र तसेच दरबारी पोशाखाची प्रतिकृती यांचा समावेश होता. या वस्तूंविषयी प्राचार्यांनी सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी कुतूहल निर्माण केले.

प्रमुख पाहुणे शिवशाहीर श्री. संकेत गांगुर्डे यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देत, “जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी शिवरायांचे धाडस, नियोजन आणि आत्मविश्वास स्मरणात ठेवा,” असा संदेश दिला. स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करणे ही आजच्या तरुण पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.