तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण अटकेत पाचोरा पोलीस स्टेशन ची आठवड्यातील सलग दुसरी कारवाई

 


पाचोरा, जि. जळगाव : जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचोरा पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत शहरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक केली आहे. आठवड्यातील शस्त्र अधिनियमांतर्गत ही सलग दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जारगाव चौफुली परिसरात एक तरुण धारदार लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार तात्काळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सोमनाथ वना पाटील (वय 19, रा. हनुमान नगर, पाचोरा) असे असून त्याच्या ताब्यातून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी शस्त्र अधिनियम कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.