रावेर (जि. जळगाव) – आठ लाख रुपयांच्या थरारक लुटीचा गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. बु-हाणपुर येथील मसाला व्यापाऱ्याची चालती गाडी अडवून ८ ते ९ इसमांनी रोख रकमेची बॅग लुटल्याची घटना ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री खानापूर आरटीओ बॅरेलजवळ घडली होती.
या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासली. अनेक अडचणी असूनही पोलिसांनी तपास सुरू ठेवत अखेर आरोपींचा माग काढला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील सात आरोपींना अटक केली –
फारुख शेख रईस (१९),
अत्ताउल्लाह खान दाऊद खान उर्फ सोनू,
शेख सईद शेख कादर सुपडू,
शेख समीर शेख कलीम उर्फ चिकू,
राहील खान दाऊद खान,
रेहमान खान अय्युब खान उर्फ भुऱ्या,
अक्रम खान इस्माईल खान.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून दोन मोटारसायकली आणि २ लाख ५५ हजार रुपये रोख, असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख हसन उर्फ ‘हसन फावड्या’ हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Social Plugin