विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या पोदार इंटरनॅशनल स्कुल,जळगाव येथे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी ‘आर्ट शेपस द फ्युचर’ या आकर्षक कला प्रदर्शनाचे उत्साहात व यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता व आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात आमना जहागीरदार व जसिता पाटील या विद्यार्थिनीनी सुंदर प्रास्ताविकातून केली. त्यांनी प्रदर्शनाच्या संकल्पनेविषयी माहिती देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री आनंद मल्हारा यांच्या हस्ते श्री शारदा प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून भविष्य घडविण्याचा संदेश दिला व त्यांच्या सर्जनशील प्रयत्नांचे मनापासून अभिनंदन केले.
शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत कला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कला क्षेत्रातही प्रगती करावी, असे आवाहन केले.
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित चित्रकला, हस्तकला व अभिनव प्रकल्प सादर केले. प्रत्येक कलाकृतीतून विद्यार्थ्यांचे कल्पनाशक्ती, कौशल्य व शिकण्याची प्रक्रिया प्रभावीपणे दिसून आली. पालक व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी रीशा बग्गा हिने उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला.

Social Plugin