धाडसी कारवाई: वाशी पोलिसांचा अफू शेतीवर छापा; ५८ किलो ओला अफू जप्त

 


वाशी (धाराशिव): वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईट उपक्षेत्रांतर्गत मौजे पाखरुड शिवारात अवैध अफू शेतीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ५८ किलो ओला अफू जप्त केला. या कारवाईत अंदाजे ८ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. अशोक चव्हाण, राजेंद्र चव्हाण आणि धोंडिबा चव्हाण यांनी आपल्या शेतात बेकायदेशीररित्या अफूची लागवड केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली.

ही धडक मोहीम पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (भूम) चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोठ्या फौजफाट्यासह छापा टाकला. कारवाईदरम्यान शासकीय पंच, कार्यकारी दंडाधिकारी, वजन-माप अधिकारी, व्हिडिओग्राफर आणि फॉरेन्सिक टीम उपस्थित होती.

छाप्यात अशोक चव्हाण यांच्याकडून ३६ किलो (₹५.४० लाख), राजेंद्र चव्हाण यांच्याकडून १८ किलो (₹२.७० लाख) आणि धोंडिबा चव्हाण यांच्याकडून ४.५ किलो (₹६७ हजार) अफूची झाडे जप्त करण्यात आली.

जागेवरच पंचनामा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून तिन्ही आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.