रावेर (जि. जळगाव) : रावेर पोलीस स्टेशनतर्फे राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान दोन अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दि. २३ मार्च २०२६ रोजी रावेर पोलीस ठाण्यात गु.र. नं. १२३/२०२६ भा.न्या. संहिता कलम ३०३(२) प्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी अब्दुल रफीक अब्दुल कादर (वय ५२, रा. नागझिरी वाडा, रावेर) हे लतिफ हॉल येथे लग्नसमारंभासाठी गेले असता त्यांची होंडा युनिकॉर्न (MH-19-DW-4895) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी शहरातील ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, मात्र आरोपींबाबत ठोस माहिती मिळत नव्हती. दरम्यान, त्याच दिवशी रात्री कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दोन संशयित इसम वाहनासह आढळून आले. कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांची कसून चौकशी करण्यात आली.
चौकशीत त्यांनी लतिफ हॉल येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६४ हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न व ५० हजार रुपये किमतीची एचएफ डिलक्स (विना नंबर प्लेट) अशी एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आमिर खान अजमल खान उर्फ जुनेद (वय १९, रा. खरणीपुरा, ता. यावल) व रोहित अशोक बिन्हाडे (वय १८, रा. सिद्धार्थ नगर, ता. यावल) अशी आहेत.
दरम्यान, या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी ४ जुगार अड्ड्यांवर छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अन्वये कारवाई केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या ३ जणांवर, अवैध दारू विक्री करणाऱ्या २ जणांवर आणि संशयितरीत्या फिरणाऱ्या २ इसमांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व त्यांच्या पथकाने केली.

Social Plugin