उल्हासनगर : प्रतिनिधी
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मानवतावादी मूल्यांना जागतिक स्तरावर नवी ऊर्जा देण्याच्या उद्देशाने जर्मनीत पहिल्यांदाच महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक प्रचार करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
२ मे २०२६ रोजी मैन्झ-कास्टेल येथील ब्युर्गरहाउस कास्टेल येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्र, पंजाब तसेच दक्षिण भारतीय समाजातील जर्मनीत स्थायिक आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन या नोंदणीकृत संस्थेच्या पुढाकाराने आणि युरोपमधील विविध आंबेडकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाबाबत अशी माहिती संतोष भागेश्वर यांनी दिली.
या उपक्रमाचे नेतृत्व रितेश कडबे करत असून, नितेश गायकवाड, रुपेश जाधव, सुभाष चव्हाण आणि रवी जीलते यांचे सहकार्य लाभत आहे. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांची जाणीव दृढ करणे आणि आंबेडकरी विचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
आंबेडकराइट्स इंटरकल्चरल मिशन ही संस्था परदेशात वास्तव्यास असलेल्या आंबेडकरी विद्यार्थी आणि कुटुंबांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक मार्गदर्शन देत सक्षम आधारव्यवस्था निर्माण करत आहे.
या कार्यक्रमाला फ्रैंकफर्ट येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या कॉन्सुलर जनरल सुश्री शुचिता किशोर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे, भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचे पठण तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन यांचा समावेश असणार आहे. सुमारे २०० नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडण्याची अपेक्षा आहे.
युरोपमधील विविध संघटनांच्या सहकार्याने आयोजित हा उपक्रम केवळ जयंती उत्सव न राहता सामाजिक परिवर्तनाच्या नव्या चळवळीची ठोस सुरुवात ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
जर्मनीतून सुरू झालेली ही चळवळ आगामी काळात संपूर्ण युरोपमध्ये विस्तारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, जागतिक पातळीवर आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

Social Plugin