जळगाव | प्रतिनिधी
रोटरी कॅलेंडरनुसार साजऱ्या होणाऱ्या पर्यावरण महिन्यानिमित्त रोटरी क्लब ऑफ ग्रीनसिटी, जळगाव यांच्या वतीने ‘पर्यावरण संवर्धन अभियान’ राबविण्यात येत आहे. रिंग रोड येथील वेव्ज क्लासेसमध्ये पोस्टर अनावरण व पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन या उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानांतर्गत जनजागृती, अंमलबजावणी आणि पाठपुरावा अशा तीन टप्प्यांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती क्लबचे सचिव ऍड. अभय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी पोस्टरमधील नियमांचे पुनर्वाचन करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.
कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षा धनश्री ठाकरे, खजिनदार डॉ. भावना चौधरी, प्रा. ए. टी. चौधरी तसेच सदस्य समीर रोकडे, अर्चना माळी, डॉ. पूजा वाघ, प्रवीण सपकाळे, विकास निकम आणि अभिजित चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण जनजागृतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
“नागरिकांच्या सक्रिय सहभागातून जळगाव शहर अधिक हिरवेगार करण्याचा संकल्प या अभियानातून साकार होईल,” असे मत आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. भावना चौधरी यांनी मानले.

Social Plugin