जळगाव प्रतिनिधी : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे वाचन संस्कृती कमी होत असली तरी पुस्तके हीच व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याने समाजात ‘बुके ऐवजी बुक’ ही संकल्पना रुजवणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रामगौरव प्रकाशन आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील निवडक लेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. भोळे होते.
कार्यक्रमात पुस्तकाचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, ग्रामगौरवचे संस्थापक विवेक ठाकरे, एलडीएम सुनील डोहरे, अनिल जोशी, अँड. अभय कुलकर्णी, राजेंद्र सोनवणे, शीतल साळी, रत्नाकर पाटील, डॉ. पूजा वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यावरील पद्मश्री ना.धो. महानोर यांच्या लेखाचे वाचन प्रा. रामचंद्र पाटील यांनी केले. तसेच त्यांच्या कन्या ज्योती राठोर यांच्या ‘माझी आई... ताई’ या लेखाचे अभिवाचन अपूर्वा वाणी यांनी सादर केले. या उपक्रमामुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये प्रतिभाताई पाटील यांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरेश उज्जैनवाल यांनी प्रास्ताविकातून आयोजनाची भूमिका मांडली. सूत्रसंचालन धनश्री ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश थोरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे उद्घाटन पुस्तकांच्या गुढीचे पूजन करून करण्यात आले.

Social Plugin