जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने मोठी संयुक्त कारवाई करत अवैध धंद्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली २४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८.०० वाजेपासून ते २५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५.०० वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी ही कारवाई राबविण्यात आली.
या धडक मोहिमेदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारी एकूण ४ वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये ट्रॅक्टर आणि डंपरचा समावेश असून जप्त वाहनांची एकूण किंमत तब्बल २५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. तसेच या वाहनांमधून ४३ हजार रुपयांची अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई भडगाव, चोपडा ग्रामीण, चाळीसगाव ग्रामीण आणि यावल या पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. संबंधित वाहनचालकांवर बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०३(२) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३०(१) व १७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील खनिज संपत्तीची चोरी रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सदर कारवाई कविता नेरकर आणि संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Social Plugin