जळगाव : आगामी सण-उत्सव तसेच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२६ च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
दिनांक २१ मे २०२६ रोजी मा. उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) अन्वये हे आदेश जारी केले.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये —
१) राम उर्फ सोनू भगवान सारवान
रा. गुरुनानक नगर, जळगाव (शनिपेठ पोलीस स्टेशन हद्द)
याच्यावर घरफोडी, जबरदस्ती चोरी (दरोडा), बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे (आर्म्स अॅक्ट), मारामारी तसेच यापूर्वीच्या तडीपारी आदेशांचे उल्लंघन करून मुक्या प्राण्यांवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचे १३ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
२) विशाल मुरलीधर दाभाडे
रा. रामेश्वर कॉलनी, चांगापाचा मंदिराजवळ, जळगाव (एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्द)
हा आरोपी घातक शस्त्रांचा धाक दाखवून नागरिकांवर जुलूम-जबरदस्ती करणे, रात्रीच्या वेळी दुकाने व घरफोडी करणे तसेच शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्यात सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.
दोन्ही आरोपींना आदेश प्राप्त झाल्यापासून दोन दिवसांच्या आत रस्ता किंवा रेल्वे मार्गाने जळगाव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मा. उपविभागीय दंडाधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय पुढील एक वर्ष त्यांना जळगाव जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.
तडीपारीच्या कालावधीत संबंधित आरोपींना ते राहत असलेल्या भागातील नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये दरमहा हजेरी लावून आपला पत्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरात दहशत निर्माण करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नसल्याचा इशारा जळगाव पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी निर्भयपणे राहावे, जळगाव पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत, असा संदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना दिला आहे.

Social Plugin