गुंतवणूकदार फसवणूक; TWJ चे संचालक अटकेत

 



जळगाव : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी TWJ असोसिएट्स प्रा. लि. कंपनीच्या मुख्य संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलींद शालिकराव पाटील, रा. जळगाव यांनी TWJ असोसिएट्स प्रा. लि. पुणे कंपनीच्या संचालकांविरोधात गुंतवणूकदारांचा परतावा न दिल्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली.

चौकशीत मिलींद पाटील हा TWJ असोसिएट्सच्या जळगाव शाखेचा फ्रेंचायसी म्हणून काम पाहत असल्याचे निष्पन्न झाले. तो गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारून करारनामे करून देत होता तसेच त्याला मोठ्या प्रमाणात कमिशन मिळाल्याचेही समोर आले. त्यामुळे या गुन्ह्यात त्याचा सहभाग स्पष्ट झाला.

तपासात असे निष्पन्न झाले की, डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत TWJ असोसिएट्स प्रा. लि. व TWJ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि. चे संचालक, एजंट आणि संबंधितांनी संगनमत करून गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेडिंगची माहिती देत जास्त परताव्याचे आमिष दाखवले. विविध ठिकाणी सेमिनार घेऊन नियमबाह्य गुंतवणूक योजना राबवण्यात आली.

या माध्यमातून 279 गुंतवणूकदारांकडून तब्बल 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपये जमा करण्यात आले. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची फसवणूक व विश्वासघात केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 165/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 316(2), 316(5), 61(2) तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम 2019 अंतर्गत कलम 21 व 23 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील जळगाव शाखेचा मॅनेजर मिलींद शालिकराव पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, मुख्य संचालक समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर हे ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात होते. न्यायालयाच्या परवानगीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने 25 मे 2026 रोजी त्यांना ताब्यात घेतले आणि 26 मे रोजी रात्री अटक केली.

दोन्ही आरोपींना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 29 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.