जामनेर : गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांना प्रतिबंध करण्यासाठी जामनेर पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात आली. या धडक कारवाईत तब्बल ६७ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम, पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, एपीआय स्वप्निल शिंदे, पीएसआय अशोक कोकाटे, एपीआय प्रमोद कथोरे, एपीआय अंकुश जाधव तसेच जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा आणि पहूर गल्ली परिसरात अचानक छापेमार कारवाई करण्यात आली. संशयित ठिकाणांची तपासणी केली असता ६ लाख १० हजार रुपये किमतीची ६७ गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली.
कारवाईदरम्यान एका ठिकाणी गोवंशाचे मांसही आढळून आले. ताब्यात घेतलेल्या जनावरांना पुढील संगोपनासाठी जळगाव येथील गोशाळेत सुरक्षितरित्या पाठविण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत जामनेर पोलीस स्टेशन येथे एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनासह नगर परिषद आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

Social Plugin