रावेर | प्रतिनिधी :
रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दि. २३ जून २०२६ रोजी रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालय परिसरातून अतुल अर्जुन महाजन (रा. कुसुंबा, ता. रावेर) यांची होंडा युनिकॉर्न (MH-19-DT-7111) ही मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची स्पष्ट ओळख पटत नसल्याने पोलिसांनी वाहनाचे फोटो आणि फुटेज विविध व्हॉट्सअॅप गटांवर प्रसारित केले. त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खानापूर येथे शोधमोहीम राबवून समाधान शंभू रमेश जाधव (वय ३३) व मनोज भागवत वंदनकर (वय ३९), दोघेही रा. खानापूर, ता. रावेर यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यावरून बुरहानपूर रोडवरील हॉटेल काकाश्रीच्या मागील वनक्षेत्रातून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये चोरीची होंडा युनिकॉर्न तसेच विना क्रमांक प्लेटची हिरो स्प्लेंडर मोटारसायकलचा समावेश आहे. स्प्लेंडर मोटारसायकलच्या मालकाचा शोध सुरू असून, आरोपींकडून आणखी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ. समाधान ठाकूर करीत आहेत.

Social Plugin